औरंगाबाद : जिल्ह्यातील सर्वात भव्य आणि प्रशस्त आयएसओ नामांकन मिळालेल्या जिल्हाधिकारी कार्यालयातच वारंवार आगीच्या घटना घडत असल्याने जिल्हाधिकारी उदय चौधरी संतप्त झाले आहेत. कार्यालयाचे रेकॉर्ड खराब होत असल्याचे लक्षात येताच जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर कारवाई करण्याचा इरादा जाहीर केला. आगीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी दोन उपजिल्हाधिकारी तसेच एक अप्पर तहसीलदार यांची समिती नेमून चार दिवसात अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिल्या आहेत.
सुसज्ज आणि भव्य अशा जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्या वर्षभरात दोन आधीच्या घटना घडल्या. काल नगररचना विभागाच्या रेकॉर्ड रूमला आग लागून महत्वाचे दस्तऐवज नष्ट झाले. तळमजल्यावरील या कार्यालयाच्या वरच्या बाजूला जिल्हाधिकाऱ्यांचे केबिन आहे. आगीने रौद्र रूप धारण केले असते तर मोठा अनर्थ ओढवला असता. जिल्हाधिकारी मुंबईला असले होते तरीही आधीच्या घटनेची बारीक सारीक माहिती त्यांनी मिळवली. नगर रचना विभागाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी गेल्या आहेत. याठिकाणी दलालांची अरेरावी सुरू असते. रोज वादविवादाचे प्रसंग येथे नेहमीच होतात. सदर कार्यालय दुसरीकडे हलवावे, अशी मागणीही अनेकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. त्यातच आगीच्या घटनेने तेल ओतले गेले.
जिल्हाधिकाऱ्यांनी नेमली अंतर्गत समिती
दरम्यान आगीच्या घटनेचा शोध घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याची विद्युत यंत्रणा आणि महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले होते. मात्र, वारंवार आगीच्या घटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आता अंतर्गत समितीमार्फत चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांच्या नेतृत्वात दोन उपजिल्हाधिकारी तसेच एक अप्पर तहसीलदारांची समिती नेमून १० जून पर्यंत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी चौधरी यांनी दिले आहेत.
दोषींवर होणार कठोर कारवाई
दरम्यान रेकॉर्ड रूमला लागलेल्या आगीने अनेक प्रश्न निर्माण झालेत.आग लागली की लावली याचा शोध घेणे महत्त्वाचे आहे. याबाबत महावितरण तसेच पीडब्ल्यूडीच्या विद्युत विभागाचा अहवाल महत्त्वाचा ठरतो. कारण रेकॉर्ड रूममधील इलेक्ट्रिक वायर सुस्थितीत होत्या. रूमच्या शेजारीच लावलेल्या विद्युत डीपीलाही धोका पोहोचला नाही. त्यामुळे आग खरेच शॉर्टसर्किटने लागली का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सारखं असुरक्षित वाटतंय
जिल्हाधिकारी कार्यालयास सारख्या उच्च दर्जाच्या आणि सुसज्ज इमारतीत काम करणारे कर्मचारी आगीच्या घटनांनी धास्तावले आहेत विशेषता महिला कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे कालच्या घटनेने आता मनात भीती निर्माण झाल्याची भावना काहींनी बोलून दाखवली काम करताना असुरक्षित वाटत असल्याचे अनेकांनी बोलून दाखविले
असाही विरोधाभास
जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या केबिन अत्यंत सुसज्ज आणि भव्य आहेत. हाय- फाय सुविधायुक्त वातानुकूलित यंत्रणांनी सज्ज या केबिन्स उच्च दर्जाच्याच आहेत. नुकतेच निवासी जिल्हाधिकाऱ्यांच्या केबिनचे नुतनीकरण करण्यात आले. तर निवडणूक विभागाचे नूतनीकरणही वर्षभरापासून सुरू आहे. लाखो रुपयांचा खर्च या केबिनवर केला जात आहे. दुसरीकडे कर्मचाऱ्यांना मात्र चांगले टेबल, संगणक आणि पंखेही उपलब्ध होत नाही, असा विरोधाभास येथे दिसून येतो.